Sharad Pawar । शरद पवारांनी साधला अजितदादांचे नाव न घेता निशाणा, म्हणाले; “अधून-मधून वारीला जाणाऱ्यांना … म्हणतात”

Sharad Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी महायुतीची साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. दोन्ही पक्षांचे नेते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येतात.

सध्या महाराष्ट्रात वारीचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यात वारी हा एक वेगळाच सोहळा असतो. या सोहळ्याचा उत्साह सर्वांनाच खूप मोहित करतो. यंदा या वारीत पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार दाखल झाल्या होत्या. अजित पवार सपत्नीक बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेत विठुनामाचा गजर केला.

पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रशियन महिलेचा किस्सा सांगत अजितदादांच्या वारीतील सहभागावर नाव न घेता निशाणा साधला. “मी एकदा रशियात गेलो होतो. त्यावेळी एक महिला मला भेटली. त्यांनी माझ्याशी मराठीत संवाद साधला. जास्त चर्चा केल्यावर, त्या महिला वारीला हजेरी लावतात असे त्यांनी सांगितले. त्या वारीला पुण्यात आल्या त्यावेळी मी त्यांना माझ्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते.

महत्त्वाचे म्हणजे त्या निमंत्रणाला मान देऊन आल्या. त्यांना पुण्यात एका महिलेने विचारले की तुम्ही वारी कुठून कुठपर्यंत करता? त्यावर, त्या रशियन महिला म्हणाल्या होत्या की, वारी ही आळंदी ते पंढरपूर अशीच करायची असते. जे लोक अधे-मध्ये जाऊन वारी करतात, त्यांना हौशे-नवशे-गवसे म्हणतात, ” अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

दरम्यान, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात काटेवाडीकडे प्रस्थान झाले. शहरातील मोतीबागेत अजितदादांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते वारीत सहभागी झाले.

Leave a Comment