मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या हाय होल्टेज राजकीय नाटकावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, सध्याच्या प्रकरणावर मार्ग निघेल. महाविकास आघाडीच्या सरकारने चांगली कामगिरी केली आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यास आणि महाराष्ट्र राज्यात भाजपची सत्ता आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची काय भूमिका असेल यावर शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. त्यांनी अशावेळी विरोधात बसण्याची तयारी असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार सुरत येथील हॉटेलमध्ये जाऊन बसलेले आहेत. अशावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार यावर वावड्या उठत आहेत. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, कोणाला मुख्यमंत्री करावे किंवा नाही हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही यावर बोलणार नाहीत. कोणत्याही राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीत मताचे विभाजन किंवा पळवापळवी ही नेहमीची बाब आहे. त्यामुळे सरकार स्थिर आहे आणि यापुढेही राहणार आहे. या परिस्थितीवर मार्ग निघणार असे शरद पवार यांनी म्हटल्याने आता यावरील वावड्या जमिनीवर येतील असे म्हटले जात आहे. (Sharad Pawar has given a clear commentary on the role of the Nationalist Congress Party (NCP) if the Mahavikas Aghadi government falls and the BJP comes to power in Maharashtra. He has made it clear that he is ready to sit in opposition.)