Sharad Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी महायुतीची साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. दोन्ही पक्षांचे नेते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येतात.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पिपाणी चिन्हाचा मोठा फटका बसला आहे. कारण शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह अन् अपक्ष उमेदवारांना दिलेले पिपाणी चिन्ह जवळपास सारखेच दिसत होते, यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. शरद पवार गटाच्या उमेदवारांना ज्याचा खूप मोठा फटका बसला.
अशातच आता एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्हाला मान्यता दिली आहे.
काल शरद पवार गटाची निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने ही मान्यता दिली. इतकेच नाही तर कलम 29 B नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यापुढे देणगी सुद्धा स्वीकारता येईल.
निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिल होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता, तसेच टॅक्स बेनिफिट मिळत नव्हतं. पण आता आमची विनंती मान्य केली आहे.”