Sharad Pawar । राजकीय हालचालींना वेग! शरद पवार देणार अजित पवारांना मोठा धक्का

Sharad Pawar । गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली. यामुळे पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते पक्षात फूट पडल्यानंतरही पक्षांतर करत आहेत.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परभणीत सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी यांची भेट झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती.

बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाले आणि तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागितलं होतं. यानंतर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, हे निश्चित झालं. हे सगळं घडत असतानाच आता खुद्द बाबाजानी दुर्राणी हे छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. विशेष म्हणजे बाबाजानी दुर्राणी यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं माध्यमांना सांगितलं आहे.

“आम्ही शरद पवार यांना भेटायला आलो होतो. त्यांनी भेटायचा वेळ दिला होता. मी शरद पवारांच्या नेतृत्वात भविष्यात काम करणार असून मी सुरुवातीपासून 1985 पासून शरद पवारांच्यासोबत आहे. मध्यंतरी थोडं आठ-दहा महिन्यांचं डायव्हर्जन झालं. समविचारी पक्षांसोबत काम करणं योग्य आहे,” अशी भावना बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली आहे.

“जिथे कार्यकर्ते, नेता आणि मतदारांमध्ये मतभेद होतात तिथे काम करणं कार्यकर्ते आणि नेत्याला कठीण होऊन बसतं. अजित पवार हे सध्या समविचारी पक्षांसोबत नसून भाजप आणि शिंदेंची शिवसेनेसोबत काम करणं कार्यकर्त्यांना अवघड होतं. काही निर्णय असे होतात,” अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.

Leave a Comment