मुंबई- बांगलादेशचा 34 वर्षीय अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) सध्या देशांतर्गत प्रतिष्ठित टी-20 बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh Premier League) स्पर्धेत व्यस्त आहे. शाकिबने मिनिस्टर ग्रुप ढाकाविरुद्ध फॉर्च्युन बरीशालकडून खेळताना विशेष कामगिरी केली आहे. अनुभवी फलंदाज महमुदुल्लाहला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवून या स्टार अष्टपैलू खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये 400 बळी घेत इतिहास रचला आहे. एवढेच नाही तर टी-20 क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा तो पहिला डावखुरा गोलंदाज ठरला आहे.
शाकिब टी-20 फॉरमॅटमधील जगातील अनेक प्रतिष्ठित लीगमध्ये भाग घेतो. त्याने आपल्या संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 94 सामने खेळले असून 93 डावात 19.8 च्या सरासरीने 117 बळी घेतले आहेत. सध्या तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज आहे. एवढेच नाही तर सध्या तो आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होने जगातील अनेक प्रतिष्ठित T20 स्पर्धांमध्ये खेळताना 554 विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होनंतर आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. ताहिरच्या नावावर टी-20 फॉरमॅटमध्ये 435 विकेट्स आहेत.
या दोन खेळाडूंनंतर तिसऱ्या क्रमांकावर कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेन आणि चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आहे. नरेनने आतापर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये 425 तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने 420 विकेट्स मिळवले आहेत. यानंतर पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत शाकिबचा नाव आहे.(Shakib became the first bowler in T20 cricket to achieve this feat)