Sanjay Nirupam : संजय निरूमप यांची काल रात्री (3 एप्रिल) काँग्रेस पक्षाने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला करत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्याचा दावा केला आहे. मात्र आता त्यांच्या या आरोपाला मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी उत्तर देत निरुपम यांच्यावर टीका केली आहे.
वर्षा गायकवाड यांनी एक्सवर ट्विट करत निरूमप यांना उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, संजय निरुपम काँग्रेस पक्ष आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलण्याची क्षमता तुमच्यात नाही. काँग्रेस पक्षाने अनेकवेळा तुमचा अट्टाहास माफ केला, पण आता करणार नाही. आता तुमची तत्त्वे आणि तुमचे राजकारण गंजले आहे, म्हणूनच तुम्ही काँग्रेस पक्षावर आरोप करत आहे.
काँग्रेस धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवते, आम्ही धर्माला विरोध करत नाही, आम्ही धार्मिक फूट पाडणाऱ्या लोकांना विरोध करत आहे. आम्ही नथुरामच्या विचारला विरोध करतो भगवान श्रीरामाला नाही.
एवढ्या वर्षांनंतरही तुम्हाला नेहरूवादी धर्मनिरपेक्षता समजली नाही याची खंत नक्कीच असेल, काँग्रेसच्या अंताचे भाकीत करणारे अनेक जण आले आणि गेले. तुम्हीही या रांगेत सामील व्हा, या सर्वांची प्रतीक्षा अनंत राहील.
पक्षाने तुमचे मोकळ्या मनाने स्वागत केले, तुम्हाला काय दिले नाही? तुम्ही कुठेही गेलात, संघटना कमकुवत केली आणि कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे लक्ष विचलित केले, याचा तुमचा राजकीय प्रवास साक्षीदार आहे. तुमच्याबद्दल काँग्रेसमध्ये या तक्रारी होत्या, तरीही आमच्या सर्वोच्च नेतृत्वाने तुम्हाला पक्षात सन्मान दिला आणि अनेक पदे दिली.
मला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही जिथे जात आहात, तिथल्या कार्यकर्त्यांबद्दल आमची सहानुभूती आहे. काँग्रेस सत्य आणि न्यायाची लढाई लढत राहील आणि जिंकेल.
काय म्हणाले होते संजय निरुपम
पत्रकार परिषदेमध्ये संजय निरुपम यांनी काँग्रेसला दिशाहीन असल्याचे म्हटले आहे. आज काँगेस पक्षाकडे संघटनात्मक ताकद नाही यामुळे अनेक नेते पक्षाला रामराम करत आहे.
तर गांधी कुटुंबाला लक्ष्य करत निरुपम म्हणाले काँग्रेसची पाच सत्ताकेंद्रे आहेत. पाचही केंद्रे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल आहेत.