Sangli Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (Sangli Lok Sabha Election 2024) जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर केला. यामध्ये काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला. सांगली मतदारसंघावर काँग्रेसने सुरुवातीपासूनच दावा केला होता. परंतु ठाकरे गटाने काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ही जागा आपल्याकडे खेचून घेतली. त्यामुळे काँग्रेसचे नेते कमालीचे नाराज झाले होते. काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्ली गाठत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
आता या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु काँग्रेसने ही जागा सोडायची नाही असा निर्धार केला असून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. परंतु आता या मतदारसंघातून भाजपला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
Sangli Lok Sabha : ‘सांगली’वरुन ठिणगी! जागा सोडण्यास ठाकरेंचा नकार; काँग्रेस नेत्यांनी गाठली दिल्ली
Sangli Lok Sabha Election
पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित सांगली लोकसभेत भाजपअंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या नाराजीतूनच माजी आमदार विलास जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपमध्ये मी आतापर्यंत प्रामाणिकपणाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले होते. परंतु पक्षाने माझी दखल घेतली नाही. उलट माझ्या विरोधात गट तयार करण्याचे आणि माझे अवमूल्यन करण्याचे काम केले. या गोष्टी मला सहन झाल्या नाहीत त्यामुळे मी भाजपला सोडचिठ्ठी दिली, असे विलास जगताप यांनी सांगितले.
Sangli Lok Sabha Election
दरम्यान, या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटील उमेदवारी करण्यावर ठाम आहेत. याआधी विशाल पाटील यांच्या पीएने उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याची बातमी आली होती. ही बातमी खरी ठरली. कारण आता मंगळवारी विशाल पाटील अपक्ष आणि काँग्रेसतर्फे अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता पदयात्रा सुरू होईल काँग्रेस कमिटीसमोर या पदयात्रेचे मेळाव्यात रूपांतर होणार आहे. यानंतर काही मोजक्या लोकांबरोबर विशाल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती मिळाली.
जर विशाल पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार आहेत. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे गटाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण या मतदारसंघात ठाकरे गटाचे ताकद फारशी नाही तरीदेखील ठाकरे गटाने या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे. आता या मतदारसंघात बंडखोरी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मतविभागणी होण्याची ही दाट शक्यता दिसून येत आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचे नेते ही संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.