SA vs AUS : हेनरिक क्लासेन (Henrich Klassen) आणि डेव्हिड मिलर (David Millar) यांच्या झंझावाती खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (SA vs AUS) चौथ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. क्लॉसेन (174) आणि मिलर (82*) यांनी पाचव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी केली, ज्याच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात 50 ओव्हर्समध्ये 5 गडी गमावून 416 धावा केल्या. यासह दक्षिण आफ्रिकेने विश्वविक्रम केला.
भारताचा विक्रम मोडला
दक्षिण आफ्रिकेने सातव्यांदा वनडे क्रिकेटमध्ये 400 किंवा त्याहून अधिक धावांचा टप्पा पार केला. एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक वेळा 400 धावांचा टप्पा पार करणारा दक्षिण आफ्रिका संघ बनला आहे. संघाने भारतीय संघाचा विक्रम मोडला. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा सहा वेळा पार केला आहे. याशिवाय इंग्लँडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच वेळा 400 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका भारतासोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होता, मात्र शुक्रवारी तो विश्वविक्रमाचा हक्कदार ठरला. दक्षिण आफ्रिकेने वनडे क्रिकेटमधील पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या केली.
क्लासेन-मिलरचे वादळ
हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेच धुतले. या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या 9 ओव्हर्समध्ये 11 चौकार आणि 14 षटकारांच्या मदतीने 164 धावा केल्या. या दोघांच्या अप्रतिम फलंदाजीने विक्रम रचले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. 10 ओव्हर्समध्ये संयुक्तपणे सर्वाधिक धावा (113 धावा) देणारा तो गोलंदाज ठरला. डेव्हिड मिलरने एकदिवसीय कारकिर्दीत 4000 धावा पूर्ण केल्या.