SA vs AUS : दक्षिण आफ्रिका संघाने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा(SA vs AUS) 164 धावांनी पराभव करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी झंझावाती खेळी करत 416 धावांपर्यंत मजल मारली, तर वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाला केवळ 252 धावाच करता आल्या.
खरं तर, दक्षिण आफ्रिकेच्या डावात अॅडम झाम्पाने (Adam Zampa) एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल करण्याचा विक्रम नोंदवला. 15 सप्टेंबर हा दिवस तो आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. त्याने 10 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये एकूण 113 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. वनडे इतिहासातील सर्वात धावा देणारी ओव्हर टाकण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय या लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत पहिला क्रमांक ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिक लुईसचा आहे, ज्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 10 ओव्हर्समध्ये 113 धावा दिल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव
वास्तविक, दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने 83 चेंडूत 174 धावांची तुफानी खेळी केली. त्याने या खेळीत 13 चौकार आणि 13 षटकार मारले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्याच्याशिवाय डेव्हिड मिलरने 82 धावांची खेळी केली. ड्युसेनने 62 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 252 धावांवर ऑलआऊट झाला. अॅलेक्स कॅरीचे शतक हुकले. 77 चेंडूत 99 धावा करून तो बाद झाला. टीम डेव्हिडने 35 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 4 आणि कागिसो रबाडाने 3 बळी घेतले.