Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धा दरम्यान (Russia Ukraine War) ताब्यात घेतलेल्या चार राज्यांमध्ये झालेल्या जनमताचा निकाल रशियाच्या (Russia) बाजूने दिसत आहे. युक्रेनच्या (Ukraine) चार प्रदेशांमध्ये अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे की लोकांनी जनमतामध्ये रशियाला सामील होण्यासाठी प्रचंड मतदान केले. रॉयटर्सच्या अहवालानुसार, 87% ते 99.2% लोकांनी पूर्वेकडील डोनेत्स्क आणि लुहान्स्क आणि दक्षिणेकडील झापोरिझिया आणि खेरसनमध्ये पाच दिवसांच्या मतदानात रशियामध्ये सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. हे चार प्रांत युक्रेनियन प्रदेशाच्या सुमारे 15% आहेत.
निकाल पाहता संयुक्त राष्ट्रात (United Nations) रशियाविरोधात ठराव आणण्याचा अमेरिकेचा (America) विचार आहे. रशियाने केलेल्या एकतर्फी जनमताचा निषेध करणाऱ्या या ठरावात सर्व देशांना या प्रदेशांना रशियाचा भाग म्हणून मान्यता देऊ नये, असे सांगितले जाईल. जनमतावर यूएनमधील यूएस दूत यांनी सांगितले की, अमेरिका युक्रेनमधील कोणत्याही बदलांना मान्यता देऊ नये आणि रशियाला आपले सैन्य मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी यूएन सुरक्षा परिषदेला (United Nations Security Council) एक ठराव सादर करेल.
रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या प्रमुखांनी राज्य माध्यमांना सांगितले की, देशाची संसद 4 ऑक्टोबर रोजी या चार राज्यांच्या विलीनीकरणावर निर्णय घेऊ शकते. त्याच वेळी, रशियाचे माजी अध्यक्ष आणि देशाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी चार प्रांतांच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि लोकांचे रशियामध्ये स्वागत केले. मात्र, युक्रेनसह अनेक देशांनी या निर्णयाला मान्यता देण्यास नकार दिला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही रशियाच्या या कारवाईवर जोरदार टीका केली आहे.