Russia Japan Tension : रशियाने जपानच्या एका राजनैतिकाला ताब्यात घेतले आहे. महत्वाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणून कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. मात्र जपानने (Japan) हेरगिरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच रशियन अधिकार्यांनी अपमानास्पद पद्धतीने चौकशी केल्याचा आरोप केला आणि रशियाने (Russia) या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली.
रशियन एजन्सींनी एफएसबीच्या हवाल्याने म्हटले आहे की, “जपानी राजनयिकाला पैशांसह महत्वाची माहिती घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.” आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील इतर कोणत्याही देशाला देण्यास मनाई असलेली रशियाबाबत माहिती त्याला मिळत होती. जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, एका अधिकाऱ्याला 22 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले आणि डोळ्यावर पट्टी बांधून चौकशी करण्यात आली. त्यांच्याशी गैरवर्तन झाले आणि आम्ही याचा निषेध करतो आणि माफीची मागणी करतो. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी मॉस्कोमधील जपानच्या दूतावासाला माहिती दिली, की अधिकाऱ्याला बेकायदेशीर हेरगिरीच्या घटनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याला 48 तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले आहे.
जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो म्हणाले की, रशियाची कारवाई पूर्णपणे निराधार आहे. मात्सुनो म्हणाले की, जपानचे उपपरराष्ट्र मंत्री टाकियो मोरी यांनी रशियाच्या राजदूताला बोलावून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. रशियन सरकारने या घटनेबद्दल औपचारिक माफी मागावी आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे, की रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये (Ukraine) लष्करी कारवाई सुरू केल्याच्या विरोधात निर्बंध लादले तेव्हापासून रशिया वारंवार जपानचा “शत्रू” देश म्हणून उल्लेख करत आहे. त्यानंतर आता रशियाने या पद्धतीने कारवाई केल्याने दोन्ही देशांतील तणाव (Russia Japan Tension) वाढणार आहे. तसाही जपान अमेरिकेचा (America) मित्र देश म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे या कारवाईवर अमेरिका काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.