नगर – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खाजगी शाळांतील प्रवेश प्रक्रियेत 19 मे पासून दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या टप्प्यात आता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (Education Officer) यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

यंदा नगर जिल्ह्यातील जवळपास 400 शाळा (School) पात्र ठरल्या आहेत. या शाळांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के म्हणजे 3058 जागांवर मोफत प्रवेश (Free Admission) देण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेश घेण्यासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातील 1778 विद्यार्थ्यांनी प्रवेश (Admission) घेतला. जागा रिक्त राहिल्याने शिक्षण विभागाने (Education Department) प्रवेश प्रक्रियेला 10 मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीनंतरही राज्यभरात जवळपास 39 हजार जागा रिक्त राहिल्या. यानंतर मात्र, मुदतवाढ मिळाली नाही. दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास 19 मे पासून सुरूवात करण्यात आली. यासाठी 27 मे पर्यंत मुदत आहे.

प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस (SMS) पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर पालकांनी पडताळणी केंद्रात कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोबाइलवर जर एसएमएस आला नाही तर वेबसाइटवरील लॉगइन मधून अलॉटमेंट लेटर (Allotment Letter) घ्यावे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह 27 मे पर्यंत पडताळणी केंद्रावरील समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाइन प्रवेश (Online Admission) निश्चित करावा. प्रवेश निश्चित केल्याची पावती घेऊन शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, याआधी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दोनदा मुदतवाढ मिळाली होती. मात्र, या मुदतीत राज्यभरात 39 हजार जागा रिक्त राहिल्या. पुन्हा मुदतवाढ देणे शक्य नसल्याने शिक्षण विभागाने प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निश्चित केले. त्यानुसार आता कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

.. म्हणून मोफत प्रवेशासाठी पुन्हा मिळालीय मुदतवाढ.. जाणून घ्या, कधीपर्यंत घेता येईल प्रवेश

Share.

Leave A Reply

Exit mobile version