Road Accidents In Maharashtra: मुंबई: रस्त्यांवर राजरोस बेदरकार वाहन चालवणे, वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, लग्न आणि इतर कोणताही सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम रस्त्यांवर आणून वाहतुकीची कोंडी करणे यासह राजकीय कार्यक्रम थेट रस्ते अडवण्यासाठी आयोजित करणे यात भारतीयांचा हातखंडा आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही रोड शो (PM Narendra Modi Election Road show issue) असेच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी करत असताना इतर मंत्री व विरोधी पक्ष मागे कसे असतील. अशावेळी पोलिस यंत्रणेवर वाढणारा ताण आणि चालकांची होणारी मानसिक कुचंबणा यामुळे देशभर रस्ते अपघात हा किरकोळ मुद्दा बनला आहे.
मात्र, अशा किरकोळ बनलेल्या मुद्यामुळे हजारो नागरिकांना आपले जीवन धोक्यात घालून रस्त्यांवर प्रवास करावा लागत आहे. अशातच आता लग्नसराईच्या काळात उन्हाचा कहर वाढून वाहन चालकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. डिजे नावाचा बेसुर प्रकार त्यात भर टाकत आहे. असे असतानाच एका अहवलाने महाराष्ट्र राज्याची झोप उडवली आहे. तो अहवाल आहे. रस्ते अपघात या विषयाचा. महाराष्ट्र पोलिसांनी रस्ते अपघातांशी (Maharashtra police report) संबंधित आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात रस्ते अपघातातील मृत्यू आणि जखमींची माहिती दिलेली आहे.
यामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले आहे की, 2022 मध्ये राज्यात 15 हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. रस्ते अपघातात असा जीव गमावलेल्या लोकांपैकी निम्म्याहून अधिक लोक बाइकस्वार आहेत. एकूण मृत्यू झालेले दुचाकीस्वार संख्या 57 टक्के आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, या अहवालानुसार 21 टक्के पादचाऱ्यांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर, राज्यात जानेवारी ते एप्रिल 2023 म्हणजेच चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 4 हजार 922 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर चार महिन्यांत तब्बल 6 हजार 800 पेक्षा जास्तजण जखमी झाले आहेत. 2020 मध्ये महाराष्ट्रात रस्ते अपघातात 11,569 जणांना जीव गमवावा लागला. तर 2021 मध्ये रस्ते अपघातात 13,528 लोकांचा मृत्यू झाला.