Rice : भारताने गेल्या आठवड्यात तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) घालण्याची घोषणा केली होती. त्याचा परिणाम आता संपूर्ण जगात आणि विशेषत: आशियाई बाजारपेठेत दिसून येत आहे. बाजारात तांदळाची किंमत झपाट्याने वाढत आहे. भारताच्या (India) निर्णयानंतर 4 दिवसात आशियाई बाजारात तांदळाच्या किमती 4 ते 5 टक्क्यांनी वाढल्या (Rice Price Increase) आहेत. यामुळे आशियातील तांदूळ व्यापार जवळजवळ ठप्प झाला आहे. कारण भारतीय व्यापारी आता नवीन करारांवर स्वाक्षरी करत नाहीत. परिणामी, खरेदीदार व्हिएतनाम आणि म्यानमारसारखे पर्याय शोधत आहेत. मात्र या देशांतील व्यापाऱ्यांनी संधी साधून भाव वाढवले आहेत. जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार भारताने गेल्या आठवड्यातच तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.
यासोबतच इतर अनेक जातींवर 20 टक्क्यांपर्यंत निर्यात कर लावण्यात आला आहे. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे स्थानिक बाजारपेठेतील तांदळाच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा अनेक भागात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत भाताची लागवड कमी होऊन उशीरही झाला आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमतीचे संकट टाळण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारत जगातील 150 हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात करतो आणि त्याच्या बाजूने निर्यात कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम त्या देशांतील किमतींवर होतो.
आधीच खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होत असलेल्या जगासाठी ही एक मोठी समस्या असू शकते. युरोप (Europe) आणि अमेरिकेतील (America) अनेक प्रदेश ऐतिहासिक दुष्काळाने (Drought) होरपळत आहेत आणि युक्रेन युद्धाच्या (Ukraine War) परिणामामुळे विविध अर्थव्यवस्थांवर दबाव वाढला आहे. युक्रेन युद्धानंतर अन्नधान्याची मागणी आणि पुरवठ्यात असमतोल आहे. यापूर्वी गहू (Wheat) आणि साखरेची (Sugar) समस्या होती आणि दोन्ही वस्तूंच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. अलीकडे भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी लादली आणि साखरेच्या निर्यातीवरही नियंत्रण ठेवले. आता तांदळावर बंदी आल्याने संकट आणखी गडद होऊ शकते.
भारताच्या निर्णयानंतर आशियातील तांदळाच्या किमती पाच टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. आता भाव आणखी वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार सत्यम बालाजीचे संचालक हिमांशू अग्रवाल म्हणतात, “आशियातील तांदळाचा व्यापार ठप्प झाला आहे. व्यापाऱ्यांना घाईत आश्वासने द्यायची नाहीत. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा 40 टक्के आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किमती किती वाढतील याची कोणालाच खात्री नाही. तांदूळ हे जगातील तीन अब्ज लोकांचे मुख्य अन्न आहे. 2007 मध्येही भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर त्याची किंमत एक हजार डॉलर प्रति टन इतकी विक्रमी पातळी गाठली होती.
भारत सरकारच्या निर्णयानंतर देशातील प्रमुख बंदरांवर जहाजांमध्ये तांदूळ (Rice) भरण्याचे काम थांबले असून सुमारे दहा लाख टन तांदूळ तेथे पडून आहे. सरकारने लादलेला नवीन 20 टक्के कर भरण्यास खरेदीदार नकार देत आहेत. कारण या तांदळाच्या किमतीबाबत फार आधीच करार झालेले आहेत आणि सरकारने लादलेला नवा कर आधीच ठरलेला नव्हता. अग्रवाल म्हणतात की वाढीव करामुळे भारताची निर्यात येत्या काही महिन्यांत 25 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आजच्या आधी जे करार झाले आहेत आणि बंदरांवर तांदूळ चढवला जात आहे, त्यांना सरकारने किमान दिलासा द्यावा.
भारताचे प्रतिस्पर्धी देश व्हिएतनाम आणि म्यानमारमधील व्यापारी भारतातून तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याचा फायदा घेत आहेत. तांदळाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी खरेदीदार या देशांकडे वळत आहेत. मात्र या देशांतील व्यापाऱ्यांनी तुकडा तांदळाच्या दरात पाच टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. डीलर्सचे म्हणणे आहे की, गेल्या चार दिवसांत, म्हणजे भारताच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर, दर 20 डॉलर्सने किंवा सुमारे दीड हजार रुपयांनी वाढले आहेत.