Healthy Breakfast : आपल्या दिवसाची सुरुवात उत्साही करण्यासाठी हिरव्या वाटाण्याचा उपमा एक परिपूर्ण खाद्य पदार्थ ठरू शकतो. मटारमध्ये प्रथिने (Protein) आणि फायबर (Fiber) भरपूर प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत मटारपासून तयार केलेला उपमा जितका स्वादिष्ट लागतो तितकाच आरोग्याच्या (Health) दृष्टीनेही चांगला असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याबाबत लोकांमध्ये आधीच्या तुलनेत जागरूकता वाढली आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आपला आहारही खूप महत्त्वाचा आहे. यामुळेच सकाळची सुरुवात नेहमी सकस नाश्त्याने (Breakfast) करावी. मटर उपमा (Matar Upma) हा असाच एक खाद्य पदार्थ आहे जो केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिकतेनेही परिपूर्ण आहे. जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल तर तुम्ही तुमच्या आवडत्या यादीत या खाद्य पदार्थाचा समावेश करू शकता. जाणून घेऊ या उपमा बनवण्याची सोपी रेसिपी (Recipe).
साहित्य – रवा – १ वाटी, वाटाणे – १ वाटी, कांदा – २, मोहरी – १/२ चमचा, लाल तिखट – 1/4 चमचा, कढीपत्ता – 7 ते 8 पाने, लिंबाचा रस – 2 चमचे, कोथिंबीर – 2 चमचे, तेल – 1 चमचा, मीठ – चवीनुसार.
रेसिपी
मटर उपमा बनवण्यासाठी प्रथम कांद्याचे लांबट तुकडे करून ठेवा. यानंतर एका कढईत रवा टाका आणि मंद आचेवर त्याचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत गरम करा. रवा शिजल्यावर प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर त्यात कढीपत्ता घालून तळून घ्या.
काही सेकंदांनंतर मसाल्यामध्ये कांदा टाका आणि 1-2 मिनिटे तळा. कांदे मऊ होऊन त्यांचा रंग सोनेरी तपकिरी झाला की त्यात सोललेले वाटाणे टाका. आणखी तीन ते चार मिनिटे परतून झाल्यावर या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी टाकून उकळू द्या. थोड्या वेळाने लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून परता. जेव्हा या मिश्रणाचे पाणी चांगले उकळू लागते तेव्हा त्यात रवा टाका आणि वरून लिंबाचा रस टाका आणि मटार उपमा मध्यम आचेवर शिजू द्या. काही वेळातच उपमातील पाणी सुकू लागेल. उपमा घट्ट झाला की गॅस बंद करा. तुमचा स्वादिष्ट मटर उपमा तयार आहे. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.