Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ अत्यंत कळीचा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) ठरला आहे. या मतदारसंघात अजूनही एकमत झालेले नाही. शिंदे गटाकडून आधीपासूनच या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. त्यानंतर भाजपनेही केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासाठी या मतदारसंघावर दावेदारी ठोकली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या राजकारणामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये कोण उमेदवार द्यायचा याचा अजून निर्णय झालेला नाही. अशा अधांतरी परिस्थितीत इच्छुक नेतेमंडळींनी प्रचाराला मात्र जोरदारपणे सुरुवात केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर प्रचाराचा धडाकाच लावला आहे. मतदारसंघांमध्ये पदाधिकाऱ्यांचे मेळावे, सभा, बैठका या माध्यमातून आपल्या राजकारण सुरू ठेवले आहे. आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे ती म्हणजे भाजप नेते नारायण राणे हे येत्या 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.
Ratnagiri Sindhudurg
राज्य सरकारमधील उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. किरण सामंत यांनी या अगोदरही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. आताही ते निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत आहेत त्यामुळे या मतदारसंघातील तिढा अजून सुटू शकलेला नाही.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले होते. नारायण राणे कोणत्याही क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात याची कुणकुण लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी किरण सावंत यांना तातडीने बोलावून घेतल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्हीही पक्ष या मतदारसंघावर दावा सोडण्यास तयार नाहीत.
Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांचे शिलेदार ठरले; तुतारी हाती घेताच लंकेंना तिकीटही मिळालं
Ratnagiri Sindhudurg
परंतु दोन्हीकडे उमेदवारांनी आपला प्रचार मात्र सुरू केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर नारायण राणे यांनी खरंच उमेदवारी अर्ज दाखल केला तर पुढे काय भूमिका घ्यायची यावर शिंदे गटाचे बरेचसे राजकारण अवलंबून राहणार आहे. नारायण राणे आज वेंगुर्ल्यात जिल्हा परिषदनिहाय बैठका घेणार होते. मात्र, या सर्वच बैठका अचानक रद्द करण्यात आल्या. यामागे काय कारण आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. तरीदेखील महायुतीत असलेल्या बेबनावामुळेच असे होत असल्याची चर्चा येथे सुरू झाली आहे.
या घडामोडींवरून दोन्ही पक्षांत तणाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता बारामतीत ज्या पद्धतीने विजय शिवतारे यांना समजावण्यात यश आले तसेच यश रत्नागिरीत महायुतीच्या नेत्यांना येईल का या प्रश्नाचे उत्तर थोड्याच दिवसात मिळेल हे मात्र नक्की.