Ram Mandir Politics । राम मंदिर उभारल्यानेच पराभव; भाजपप्रणीत महायुतीच्या माजी खासदारांचा मोठा दावा!

Ram Mandir Politics । देशात नुकताच लोकसभेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. घटक पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून यावरून विधानसभेचेदेखील चित्र स्पष्ट झाले आहे.

लोकसभेत काही मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत होती, यापैकी एक मतदारसंघ म्हणजे शिर्डी मतदारसंघ होय. निवडणूक निकालानंतरही शिर्डी मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शिर्डी मतदारसंघांत शिवसेना शिंदे गटा पराभव झाला आहे. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणूक लढवण्यास उभे राहिले होते.

पण त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. पराभवानंतर पत्रकारांशी बोलताना सदाशिव लोखंडे यांनी पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “शिर्डी मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो. तो रावणाला मानणारा समाज असून राम मंदिर बांधल्यामुळे तो कमालीचा दुखावला गेला आहे. त्यामुळे माझ्या विरोधात मते गेली आहेत. तसेच या मतदारसंघात साखर कारखानदारांचे मोठे साम्राज्य आहे. एक साखर कारखानदार दुसऱ्या विरोधात राजकीय लढाई करतो. याचाही मला फटका बसला आहे”, असेही सदाशिव लोखंडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सदाशिव लोखंडे हे शिर्डी येथे खासदार होण्यापूर्वी ते कर्जतचे पंधरा वर्षे आमदार होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर सदाशिव लोखंडे आपल्या समर्थकांच्या भेटीगाठीसाठी ते गेले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पराभवामागील कारणांबद्दल विचारले असता त्यावर सदाशिव लोखंडे यांनी हे उत्तर दिले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशाप्रकारे उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment