Raju Shetti : लोकसभेचा पराभव झुगारून राजू शेट्टींची मोठी घोषणा, ‘इतक्या’ जागांवर लढवणार निवडणूक

Raju Shetti : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना सर्वात मोठा धक्का बसला होता. अशातच राज्यात अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत, त्यापूर्वी राजू शेट्टी यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

बारामतीत मागील दोन दिवसांपासून स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठक सुरु होती, या बैठकीची सांगता रविवारी झाली. यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टींनी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे.

“राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार आहे,” अशी मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांना लोकसभेत मोठा पराभव सहन करावा लागला. तरीही राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांच्या साथीने निवडणुका लढण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १४ ठराव पारित केले असून त्या ठरावांचा सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. जर सरकारने या मागण्या मान्य केल्या तर आम्ही सरकार बरोबर असू नाही तर आम्ही आमची एकला चलो रे भूमिका पार पाडू, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाविकास आघाडी निवडावी की महायुती या विषयावर मात्र राजू शेट्टी यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.

यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “विधानसभेला कोणाबरोबर यासंदर्भात अजूनही आमचा निर्णय झाला नाही. आम्हाला फक्त सत्ताच हवी असे नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांपेक्षा हा प्रश्न देखील दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.”

Leave a Comment