Rajasthan Political Crisis : राजस्थानमध्ये सध्या निर्माण झालेल्या राजकीय संकटाचा (Rajasthan Political Crisis) फटका मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांना बसताना दिसत आहे. त्यांच्यासाठी पुढील वाटचाल दिवसेंदिवस कठीण होत आहे. काँग्रेसच्या (Congress) निवडणुक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले, की अध्यक्षपद निवडणुकीत गेहलोत उमेदवारी अर्ज भरणार किंवा नाही याबाबत काही सांगता येणार नाही. यावरून हे स्पष्ट होत आहे, की पक्ष नेतृत्व गेहलोत यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याचा विचार करत नाही. इतकेच नाही तर आता मुख्यमंत्री पदाबाबतही नेतृत्व काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावेळी असे म्हणता येईल की गेहलोत यांच्यामुळे निर्माण झालेल्या या राजकीय संकटाचा फायदा अध्यक्षपद निवडणुकीतील संभाव्य उमेदवा शशी थरूर (Shashi Tharoor) यांना मिळेल.
काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या (Congress President Election) प्रक्रियेसंदर्भात मधुसूदन मिस्त्री यांनी मंगळवारी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी आतापर्यंत काय तयारी करण्यात आली आहे. मिस्त्री म्हणाले, ‘आम्ही सांगितले की निवडणुकीसाठी आतापर्यंत काय तयारी करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच निवडणुका होतील. आतापर्यंत केवळ शशी थरूर आणि पवन बन्सल (Pawan Bansal) यांनीच उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवनकुमार बन्सल यांनी अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. कदाचित तो कोणालातरी पाठिंबा देईल.
दुसरीकडे, मिस्त्री म्हणाले की, शशी थरूर यांच्या प्रतिनिधीने 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अशोक गेहलोत यांच्याबाबत ते म्हणाले की, ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत की नाही याबाबत काहीही माहिती नाही. यावरून अशोक गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले असून, ते मंगळवारी किंवा बुधवारी उमेदवारी दाखल करू शकतात, असे बोलले जात होते.