दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने या वर्षाच्या शेवटी आणि 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नियोजन सुरू केले आहे. 2023 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातीच भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्या नावावर निवडणूक लढणार नाही. या राज्यांमध्ये नवीन पिढी पुढे आणण्याचे काम केले जात आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर येईल. नोव्हेंबर 2022 मध्ये गुजरात, हिमाचल आणि 2023 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपने संपूर्ण रणनीती तयार केली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सलग तीन वेळा मुख्यमंत्री होते. डिसेंबर 2018 च्या विधानसभा निवडणुकीत चौहान भाजपला सत्तेपर्यंतघेऊन जाऊ शकले नाहीत. भाजप काँग्रेसपासून काही जागांनी मागे राहिला, त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये 17 डिसेंबर 2018 रोजी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते.
दीड वर्षानंतर भाजपने राजकीय अंकगणिताद्वारे कमलनाथ सरकार पाडले, त्यानंतर मार्च 2020 मध्ये शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. परंतु, आता भाजप मध्य प्रदेशमध्ये नवीन नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवराजसिंह चौहान यांना केंद्राच्या राजकारणात केव्हाही आणले जाऊ शकते. त्यामुळे मध्य प्रदेशातील भावी पिढीसाठी नेतृत्व तयार होण्यास मदत होईल. अशीही पक्षांतर्गत चर्चा आहे. शिवराज जोपर्यंत मध्य प्रदेशात आहेत, तोपर्यंत नवे नेतृत्व घडवणे शक्य होणार नाही. मध्य प्रदेश हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे, जे त्यांना कोणत्याही परिस्थितीत गमावायचे नाही. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांचा दर्जा सातत्याने वाढत आहे.
रमण सिंह हे 2004 ते नोव्हेंबर 2018 पर्यंत सलग तीन वेळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. डिसेंबर 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. अशा परिस्थितीत भाजपला आता छत्तीसगडमध्ये एक नवा चेहरा आणायचा आहे. मात्र यासोबत भाजप 2023 आधी कोणताही नवा चेहरा आणणार नाही हेही निश्चित आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी वाढणार आहे. अशा परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच नवा चेहरा समोर येईल.
डिसेंबर 2013 मध्ये राजस्थानमध्ये प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणाऱ्या भाजपला डिसेंबर 2018 च्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वात पराभवाला स्वीकारावा लागला होता. सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नावावर भाजपला दणदणीत विजय मिळाला. भाजपने राज्यात 25 जागा काबीज केल्या होत्या. काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
गेल्या दोन दशकांपासून राजस्थानमध्ये वसुंधरा यांचे भाजपवर वर्चस्व आहे. पण आता पक्ष राजस्थानमध्ये नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. वसुंधरा यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. मात्र राजस्थानमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2023 ची विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षासाठीही हा मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. पुढील एक ते दोन दशके राजस्थानमध्ये पक्षासमोर नेतृत्वाचे संकट उभे राहू नये, यासाठी पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर चेहरा आणेल.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप राष्ट्रीय नेतृत्व नवा चेहरा आणण्याचा प्रयत्न करत असले तरी निवडणुकीआधी चेहरा समोर आणणे पक्षाला अवघड आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले. कारण यामुळे गटबाजी वाढण्याची शक्यता आहे. हे पाहता भाजप 2023 च्या निवडणुका तिन्ही राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढणार आहे.
बेभरवशाचे राजकारण..! अखिलेश यादव यांच्या अडचणी वाढणार; भाजपने तयार केलाय ‘हा’ खास प्लान..