Rain Updates । मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्या-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर मागील 48 तासांमध्ये पावसामुळे पाच जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
पुण्यातील पावसाची स्थिती
मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पुर आला आहे. अनेक धरणं पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठ आणि सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून जिल्ह्याचा घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले आहे. हवामान खात्याकडून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आणि पुणे शहरासह पूर्वेकडील भागात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
दरम्यान, माहीतीनुसार समुद्रा सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळच्या किनारपट्टी पर्यंत सक्रिय असल्याने कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.
मुंबईतील पावसाची स्थिती
भारतीय हवामान खात्याकडून मुंबईत शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. शहरासह उपनगरातल्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, मुंबईमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती दिली आहे. हवामान खात्याकडून पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.