Rain Update । विजेच्या कडकटांसह राज्याच्या अनेक भागात अतिमुसळधार पाऊस, ‘या’ ठिकाणी दिला सतर्कतेचा इशारा

Rain Update । सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे तर अनेक भागात अजूनही पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अशातच आता पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील अनेक शहरांना आज पहाटे पासून पावसाचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. ठाणे, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाऊस झाला असून मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन कोलमडून गेले आहे. अशातच आता हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळी किल्ले रायगडावर ढग फुटी प्रमाणे पाऊस झाला असून किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. मुंबईमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा बंद केली आहे. कर्जत, कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू असून कर्जत बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस थांबला असल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात आली असून जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर आहेत. तसेच हवामान विभागाकडून आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईमध्ये पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून संपूर्ण मुंबईत पाणी साचले असल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे. भांडुप रेल्वे स्थानक पाण्याखाली गेलं असून, सीएसएमटीवरून ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज

विदर्भातील काही जिल्ह्यांत हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment