Rain : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Rain) होत आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला आहे. त्यामुळे नद्या, धरणे ओव्हर फ्लो आहेत. या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली आहे. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar District) यंदा जोरदार पाऊस पडला असून तीन महिन्यांतच पावसाने सरासरी पार केली आहे. जिल्ह्यात आजमितीस तब्बल 448 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारीही जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू होता. सायंकाळनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे नुकसानही झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे (Crop) नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरेही पडली आहेत. पशुधनाला फटका बसला आहे. या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

सप्टेंबर महिन्यातही जोरदार पाऊस होत आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही पुढील दिवसांतही पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या पावसाने मात्र जिल्ह्यात सरासरी पार केली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान नगर तालुक्यात 479 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच पारनेर 414 मिमी, श्रीगोंदे 402.9 मिमी, कर्जत 447.4 मिमी, जामखेड 576.1 मिमी, शेवगाव 463.2 मिमी, पाथर्डी 473.1 मिमी, नेवासे 429.8 मिमी, राहुरी 431.8 मिमी, संगमनेर 351.2 मिमी, अकोले 488.5 मिमी, कोपरगाव 404.3 मिमी, श्रीरामपूर 463 मिमी आणि राहाता तालुक्यात 454 मिमी इतका पाऊस आतापर्यंत पडला आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version