मुंबई : विमा ही खूप गरजेची आणि महत्वाचे म्हणजे जोखीम संरक्षण घेऊन आपल्यासह कुटुंबीयांना अपघाती घटनेत मदतीची अशी बाब आहे. मात्र, भारतीय जनता अजूनही त्याबाबत तितकी सीरियस नाही. मात्र, आता त्याबाबत चित्र बदलत आहे. अनेकजण विमा घेण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. अशावेळी भारतीय रेल्वेही यात अजिबात मागे नाही. कारण भारतात अजूनही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतेक नागरिक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. अर्थात कमी भाडे हे त्यामागचे सर्वात महत्वाचे मोठे कारण आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी हवाई आणि रस्ते वाहतुकीपेक्षा तुलनेने कमी खर्च येतो.
सहसा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनमधील स्लीपर किंवा इतर सीटसाठी आरक्षण केले जाते. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शक्य असते. ऑनलाइनमध्ये जागा आरक्षित करताना तुम्ही रेल्वेच्या वेबसाइट आणि इतर अॅपद्वारे तुमच्या आवडीची तिकिटे बुक करू शकता. तर ऑफलाइनमध्ये तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या खिडकीवर जाऊन थेट तिकीट बुक करावे लागते. रेल्वेने प्रवास करणार्या सर्व प्रवाशांना प्रवास विमा दिला जातो. रेल्वे वेबसाइट, अॅप किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करताना आपल्याला प्रवास विम्याचा (ट्रॅवल इन्शुरन्स) पर्याय दिसतो. यामध्ये फक्त एक रुपया किंवा त्यापेक्षा कमी खर्चात प्रवास विमा (ट्रैवल इंश्योरेंस) दिला जातो. बहुतेक लोक या विम्याचा पर्याय निवडत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात. यात प्रवासादरम्यान झालेला कोणताही अपघात आणि त्यामुळे तुमचे होणारे भौतिक नुकसान या बदल्यात रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाते. एसबीआय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड रेल्वेच्या वतीने हा प्रवास विमा सेवा सुरू आहे.
याद्वारे प्रवासी विमा निवडणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला रेल्वेकडून 10 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. तसेच अशा अपघातात पूर्णपणे अपंगत्व आलेल्या प्रवाशाला आर्थिक मदत म्हणून 10 लाख रुपये मिळतात. अशा अपघातामुळे अंशतः अपंगत्व आल्यास रेल्वेकडून प्रवाशांना 7,50,000 रुपये मिळतील, तर अपघातातील गंभीर जखमींना 2,00,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारासाठी 10 हजार रुपये रेल्वेकडून दिले जातात. म्हणजेच जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना अपघाताला बळी पडलात तर तुम्हाला रेल्वेकडून अशा पद्धतीने आर्थिक नुकसान भरपाई मिळेल.