Rahul Gandhi : भारतीय संसदेत मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भारतीय जनता पक्षात लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे.
आता राहूल गांधी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या समितीच्या बैठकीत लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले की, माझे वक्तव्य कोणत्याही देशाबाबत किंवा सरकारबाबत नव्हते. माझे विधान एका व्यक्तीबद्दल होते. भारताच्या लोकशाहीबाबत काय बोलले गेले, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही तो सोडवू. त्यांनी केवळ भारतीय लोकशाहीवरच प्रश्न उपस्थित केला, त्यासाठी त्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही, असेही राहूल गांधी म्हणाले.
काँग्रेस आणि भाजप खासदारांमध्ये वाद
परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी संसदीय सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. यामध्ये G-20 मध्ये भारताच्या अध्यक्षपदावर चर्चा झाली. प्रथम परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यावर सादरीकरण केले. या बैठकीत राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे. सत्ताधारी भाजप ज्या पद्धतीने दावा करत आहे, त्या पद्धतीने मी बोललो नाही, असे राहुल गांधी म्हणाले. त्याचवेळी, या विषयावर बोलण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, असे म्हणत राहुल गांधींच्या टिप्पणीला भाजप खासदारांनी विरोध केला.
यादरम्यान काँग्रेस खासदार आणि भाजप खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. समितीचे अध्यक्ष परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींना रोखले आणि त्यांनी फक्त आजच्या विषयावर बोलावे असे सांगितले. संसदेत जे काही बोलायचे ते बोलू शकतो, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांना सांगितले.
राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व जाऊ शकते का?
दुसरीकडे, ब्रिटनच्या दौऱ्यात राहुल गांधींनी भारतीय लोकशाहीबद्दल जे काही बोलले, त्यानंतर संसदेपासून ते रस्त्यावर प्रचंड गोंधळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास त्यांना लोकसभेतून निलंबित करण्याची सत्ताधारी भाजपची तयारी आहे. यासाठी भाजपने लोकसभा अध्यक्षांशी संपर्क साधला आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू झाले आहेत.
लंडनमध्ये राहुल गांधी काय म्हणाले?
यूके दौऱ्यात राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी भारताच्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी भारतातील संस्थांच्या नियंत्रणाखाली असल्याबद्दल बोलले होते. यासोबतच त्याने फोनवर हेरगिरी केल्याचा आरोपही केला. राहुल गांधी यांनी केंब्रिजमधील बिझनेस स्कूलमध्ये केलेल्या भाषणात भारतातील लोकशाही संस्थांवरील हल्ल्याचा उल्लेख केला. त्याने सांगितले होते की त्याच्या फोनची हेरगिरी केली जाते.