Rahul Gandhi । काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड हायकोर्टाचा खूप मोठा धक्का बसला आहे. हे प्रकरण देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी केलेल्या टिप्पणीशी निगडित आहे. आता या प्रकरणी राहुल गांधींविरोधात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.
राहुल गांधींविरोधात रांची कोर्टात तक्रार दाखल
भाजपच्या एका कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बदनामी केल्याचा आरोप करत रांची कोर्टात तक्रार दाखल केली होती. नवीन झा यांचा आरोप होता की, 18 मार्च 2018 रोजी काँग्रेसच्या पूर्ण अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपविरोधात केलेल्या भाषणात अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
काँग्रेस नेत्याने केलेला आरोप खोटाच नाही तर भाजपसाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या नेत्यांचा, समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान आहे, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे.पण झा यांची तक्रार रांची दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी रांची न्यायिक आयुक्तांसमोर पुनर्विचार याचिका दाखल केली.
15 सप्टेंबर 2018 रोजी या याचिकेला परवानगी दिली. त्यानंतर, दंडाधिकाऱ्यांना रेकॉर्डवरील पुरावे तपासण्यासाठी नवीन आदेश पारित करण्याचे निर्देश दिले होते. न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत समन्स बजावले आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या खटल्याची अनेक वेळा सुनावणी झाली.
राहुल गांधी यांची याचिका पुन्हा एकदा झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून आता राहुल गांधींना हायकोर्टाचाही खूप मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळून लावली असली पण झारखंडमध्येच नाही तर उत्तर प्रदेशातही राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.