दिल्ली : आपल्याकडे खड्डे नसलेला रस्ता सापडणे तसे कठीणच. फक्त काही राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सोडले तर बाकीचे सगळेच रस्त्यांवर खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचीही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळेच प्रदेशातील नव्या सरकारने फक्त दोन महिन्यात राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे जाहीर केले आहे. होय, नव्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जितिन प्रसाद यांनी दोन महिन्यात संपूर्ण राज्यातील रस्ते खड्डेमुक्त केले जातील, असे म्हटले आहे.
नव्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये पीडब्ल्यूडी मंत्री झालेले जितिन प्रसाद यांनी राज्यातील रस्त्यांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, की संपूर्ण उत्तर प्रदेशातील सर्व रस्ते दोन महिन्यांत खड्डेमुक्त होतील आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जितिन प्रसाद यांच्याकडे तंत्रशिक्षण खाते होते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पीडब्ल्यूडी खाते सांभाळत होते. यावेळी मौर्य यांना ग्रामीण विकास मंत्रालय देण्यात आले आहे. त्याचवेळी अपना दलचे आशिष पटेल यांच्याकडे यावेळी तंत्रशिक्षण खाते देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुका होण्याआधी सुद्धा तेव्हाच्या भाजप सरकारने दोन महिन्यांत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची मोहिम सुरू केली होती. ही मोहिम 20 सप्टेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 या काळात राबवण्यात आली. या मोहिमेत सगळे रस्ते खड्डेमुक्त केले की नाही, हे काही माहित नाही. मात्र, आता नव्या सरकारमधील मंत्र्यानेही पुन्हा तीच घोषणा केली आहे. यावरुन असे दिसून येत आहे, की मागील सरकारने हाती घेतलेली मोहिम यशस्वी ठरली नाही. त्यानंतर आताही इतक्या मोठ्या राज्यातील लाखो रस्त्यांवरील खड्डे फक्त दोन महिन्यात गायब होतील आणि सरकार हे काम पूर्ण करील, याचीही शाश्वती कमीच आहे.
वाव.. निवडणुकीचा होतोय ‘असा’ ही फायदा; ‘या’ राज्यातील रस्त्यांबाबत सुरू होणार ‘हे’ अभियान