Pune / पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कात्रज (Katraj) येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून (Rajiv Gandhi zoo) चितळ आणि सांबर हे वन्यजीव गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खांदकाची भिंत खचल्याने ते पळून गेले असावेत असा शक्यता व्यक्त केली जात असताना प्रशासनाने मात्र हे वन्यजीव प्राणिसंग्रहातच आहेत कुठेतरी लपून बसले असावेत असा दावा केला आहे.
मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संग्रहालयातील सांभर खंदकात ३२ चितळ व २८ सांभर होते. त्या खंदकास मोठे भगदाड पडले असून ६० प्राण्यांपैकी दोन चितळ व एक सांभर बेपत्ता असल्याचे संग्रहालय व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र सोमवारी संध्याकाळपर्यंत तपास लागला नाही. या घटनेची माहिती वन्यजीव प्रेमींना मिळल्यानंतर त्यांनी संग्रहालय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे विचारपूस केली. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत सर्व प्राणी आहेत असे सांगितले. माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दोन चितळ गायब झाले आहेत. ते प्राणी संग्रहालयातच असून ते कर्मचाऱ्यांच्या नजरेस आले आहेत. त्याचे फोटोही आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मागे लागल्यास ते घाबरून दुसरीकडेच जाऊन बसतील. त्यामुळे त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांचा शोध घेणे चालू आहे.
– अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक
संग्रहालयातील वन्यजीव कोठेही गेलेले नाहीत. ते प्राणी संग्रहालयातच आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. खंदकाची भिंत जुनी असल्याने ती पडली होती. त्याठिकाणी पत्रे लावून ती व्यवस्थित करण्यात आली आहे.
– विलास कानडे, अतिरिक्त आयुक्त