Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात दारुच्या नशेत केलेल्या पोर्श अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी नशेत नसल्याचे दाखविण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे सॅम्पल बदलल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी सकाळी 11 वाजता अल्पवयीन मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. यावेळी, त्याच्या रक्ताचा नमुना अल्कोहोलचे सेवन न केलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याने बदलण्यात आला होता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिला रक्ताचा नमुना घेतल्यानंतर चाचणी अहवालात अल्कोहोल असल्याची पुष्टी झाली नाही. यामुळे संशय निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा रक्ताचा अहवाल आल्यावर अल्कोहोल सेवन केल्याची खात्री झाली. 19 मे रोजी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याचे उघड झाले.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना 19 मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल यांच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार अभियंत्यांना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शने चिरडले होते, त्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेच्या 14 तासांनंतर, आरोपी अल्पवयीन व्यक्तीला काही अटींसह न्यायालयातून जामीन मिळाला.
न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश दिले होते. पण संबंधित आरोपी हा दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या अल्पवयीन आरोपी सुधारगृहात आहे.
दोन पोलीस निलंबित
महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेत सहभागी असलेल्या दोन पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप झाला होता. घटनेनंतर हे दोन अधिकारी सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचले. असे असूनही दोघांनीही या घटनेची माहिती वरिष्ठांना आणि नियंत्रण कक्षाला दिली नाही. येरवडा पोलिस ठाण्याच्या या दोन पोलिस अधिकाऱ्यांना पुणे आयुक्तांनी निलंबित केले आहे.