पुणे: अपंगांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा पिंपरी-चिंचवड पालिकेचा मानस आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.अपंग दिनानिमित्त चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात आयुक्तांनी अपंगांसमवेत संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. उज्ज्वला आंदूरकर, मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, मिलिंदराजे भोसले, राजू हिरवे, परशुराम बसवा आदी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, अपंगांना विविध कार्यालयात सहजतेने पोहोचता यावे, यासाठी योग्य रॅम्पव्यवस्था आवश्यक आहे. त्यादृष्टीने पालिका कार्यालयांमध्ये दक्षता घेतली जाईल. मुख्यालयात अपंगांसाठी स्वतंत्र शौचालय तयार केले जात आहे. अपंग बांधवांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. पालिकेच्या वतीने शहरामध्ये सर्वेक्षण करण्याचा विचार असून शहरातील अपंग बांधव विविध योजनांपासून वंचित राहू नये, असा प्रयत्न राहील, असे आयुक्तांनी सांगितले.अक्षय सरोदे यांनी ‘ अपंग नागरिकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांतगा इंदलकर यांनी केले.
must read