Pune: पुणे: शहरात दोन तासाच्या मुसळधार पावसाने दाणादाण (Heavy Rain issue in Pune) उडाल्यानंतर आता यावरून राजकारणाला (Pune Dirty Politics) सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महापालिकेत बोट आणून ‘बोट दाखवा, बोट थांबवा’ अशा घोषणा देत भाजपविरोधात (BJP) उपरोधिक आंदोलन करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर आम आदमी पक्षाने शहराच्या या स्थितीला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन यापुढे अशी घटना घडू नयेत यासाठी गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली आहे.
गेल्या पाच वर्षात भाजपची सत्ता असताना त्यांच्या नियोजनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. शहरात सर्वत्र पाणी साठले आहे. भाजपाच्या या नियोजनशून्य कारभाराचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आहे. पुण्यातील भाजपा नेत्यांनी हे शहर बकाल करुण खुद्द पंतप्रधानांना खोटे पाडले आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या शब्दाचाही मान त्यांना ठेवता आला नाही, अशी टीका देशमुख यांनी यावेळी केली. मृणालिनी वाणी, विनोद पवार, उदय महाले, संतोष नांगरे,भूषण बधे, वनिता जगताप, मंगल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
शिवसेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. आंबिल ओढ्याला पुर हा बिल्डर्सच्या फायद्यासाठी नाला सरळीकरणाचा घाट घातल्याने नागरिकांच्या घरात शिरले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. सिग्नल व्यवस्था बंद पडली. यासंदर्भात त्वरित बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांवर आरोप करत असले तरी हे सर्व या दोघांच्याही काळात आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ओढे नाले बुजविले गेले. २०१९ मध्ये आलेल्या पुरानंतर २०२२ मध्येही आपण काहीही शिकलेलो नाहीत. हे दोन्ही पक्ष पुणेकरांच्या सुरक्षेसाठी संवेदनशील नाहीत, अशी टीका आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
‘‘राष्ट्रवादी काँग्रेसला आंदोलन करून दिशाभूल करण्याची पद्धत आहे. त्यांच्याच नेत्यांनी महापालिकेत आणून बसविलेल्या प्रशासकाने नाले सफाईची कामे व्यवस्थित केली नाही, यात सफाईत भ्रष्टाचार झाला. त्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. तसेच मागचे पाच वर्ष वगळता गेले कित्तेक वर्ष महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी नियोजन न करता विकास केला. त्यांचे हे पाप कधीही धुतले जाणार नाही. ’’
– जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप