Pune Ganesh Festival: पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले आहेत. गेल्या पाच दिवसात शहरात २७ हजार ३७५ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. यापैकी १६ हजार ७२५ गणेश मूर्ती या शहरात विविध ठिकाणी ठेवलेल्या लोखंडी टाक्यांमध्ये करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. सार्वाजनिक मंडळांना मोठे मांडव, देखावे करण्यावर बंदी घातली होती. नागरिकांनीही घराबाहेर न पडता घरातच उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पुणेकरांनी संयमाने उत्सव साजरा केला होता. त्यानुसार महापालिकेने (Pune Municipal Corporation) गणेश विसर्जनासाठी संपूर्ण शहरात उत्तम व्यवस्था उभी केली. यामध्ये प्रत्येक भागात लोखंडी टाक्या, तसेच फिरते विसर्जन हौद ठेवले.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. महापालिकेने विसर्जनासाठी ३०३ ठिकाणी व्यवस्था केली आहे. तर १९१ मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन केंद्र २८०, फिरते हौद १५० अशी व्यवस्था केली आहे. दीड दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस आणि पाचवा दिवस असे आत्तापर्यंत २७ हजार ३७५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे. यापैकी १५ हजार ८३२ मूर्ती पाचव्या दिवशी झालेल्या आहेत. गतवर्षी मूर्ती संकलनासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. एकूण मूर्ती विसर्जनामध्ये ४० ते ४५ टक्के मूर्ती या विसर्जन न करता त्यांचे संकलन केले जात होते. यंदा २७ हजार ३७५ मूर्तींपैकी ३ हजार ९१८ मूर्ती संकलन झाल्या आहेत. हे प्रमाण अवघे १४ टक्के इतके आहे. तर यंदा महापालिकेने गरज नसतानाही १ कोटी ४१ लाख रुपये खर्च करून १५० फिरत्या हौदाची निविदा मान्य केली आहे. या हौदात २ हजार १७४ मूर्ती विसर्जित केल्या आहेत.
पाच दिवसात महापालिकेकडे २९ हजार ६७७ किलो निर्माल्य जमा झाले आहे. हे निर्माल्य महापालिकेतर्फे गांडूळ खत तयार करण्यासाठी तयार केले जाणार आहे. नंतर हे खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये व शेतीसाठी दिले जाणार आहे. ‘‘गणेशोत्सवाच्या पाच दिवसात २७ हजार ३७५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे, तर २९ हजार ६७७ किलो निर्माल्य जमा झाले आहे. नागरिकांना घराच्या जवळच विसर्जन करता यावे यासाठी लोखंडी हौद, मूर्ती संकलन केंद्र, फिरते हौद अशी व्यवस्था केली आहे,’’ अशी माहिती आशा राऊत (उपायुक्त, घनकचरा विभाग) यांनी दिली आहे.
- पाच दिवसात झालेले विसर्जन
- बांधलेल्या हौदात मूर्तीचे विसर्जन – ४५५८
- लोखंडी टाकीत मूर्तीचे विसर्जन -१६,७२५
- संकलित केलेल्या मूर्ती – ३९१७
- फिरत्या हौदात मूर्तीचे विसर्जन – २१७४
- संकलित केलेले निर्माल्य – २९६६७ किलो