Politics News : समाजवादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्वाखाली सपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्ष कार्यालयापासून विधानभवनावर मोर्चा काढत आहेत. वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या निषेधार्थ सपाने या पदयात्रेचे आयोजन केले आहे. या घडामोडींमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण (Politics) तापले आहे.
व्हीव्हीआयपी चौकापासून एसपी कार्यालयापर्यंत बॅरिकेडिंग करून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या मार्गावरून सर्वसामान्यांची ये-जा बंद करण्यात आली आहे. पदयात्रेसाठी अखिलेश यादव सव्वा दहाच्या सुमारास एसपी कार्यालयात पोहोचले. पक्षाचे इतर आमदारही कार्यालयात पोहोचले आहेत. येथून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार आणि कार्यकर्ते विधानभवनाकडे पायी रवाना झाले. आमदार आणि कार्यकर्त्यांनी हातात घोषणांचे फलक घेतले आहेत.
सोमवारपासून उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 23 सप्टेंबरपर्यंत चाललेले 18 व्या विधानसभेचे दुसरे अधिवेशन शांततेत पार पाडण्यासाठी रविवारी सभापती सतीश महाना यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात महाना यांनी सर्व पक्षांना सभागृह सुरळीत चालण्यासाठी मदत करण्याची विनंती केली, मात्र विरोधकांनी महागाई (Inflation) आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची घोषणा केली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकार अपयशी ठरत आहे, असे मुख्य विरोधी पक्षाचे मनोज कुमार पांडे म्हणाले. राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. महागाईमुळे जनतेला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. सभागृहात या प्रश्नांच्या आधारे सरकारला घेरले जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेससह (Congress) अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महागाई आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची घोषणा केली आहे.