Politics : उत्तर भारतात सध्या जनावरांच्या लम्पी स्किन (Lumpy Skin) या आजाराने थैमान घातले आहे. राजस्थान, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड या राज्यात लाखो जनावरे या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. तर हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे. सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले आहे. या आजाराने सध्या तरी सरकारला हैराण केले आहे. असे असताना विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसशासित राज्य राजस्थानमध्ये (Rajasthan) सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार राजकारण (Politics) सुरू आहे.
लम्पी व्हायरसमुळे राज्यात हजारो गायींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी विरोधी पक्ष भाजप (BJP) या मुद्द्यावरून राज्यातील गेहलोत सरकारवर हल्लाबोल करत आहे. राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) भाजप कार्यकर्ते गेहलोत सरकारविरोधात जोरदार निदर्शने करत आहेत. आजाराची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधक करत आहेत.
जयपूरमध्ये आज शेकडो भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. भाजप कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. आंदोलक गेहलोत सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलीस आटोकाट प्रयत्न करत आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की राजस्थानमध्ये लम्पी विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांत 60 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 8 लाख गायी लम्पी बाधित आहेत. राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये रोगाने थैमान घातले असल्याचे सांगण्यात येत आहे. लम्पी विषाणूमुळे (Lumpy Virus) मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने राज्यात दुधाचे उत्पादनही (Milk Production) घटले आहे. अनेक जिल्ह्यांत त्याचे दर वाढले आहेत.
तसे पाहिले तर हा आजार सातत्याने फैलावत चालला आहे. आटोक्यात येण्याची परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. उत्तरेनंतर दक्षिणेतील राज्यांतही बाधित जनावरे आढळू लागली आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra) या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. आजार आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. जनावरांची लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच आजारी जनावरांवर तातडीने उपचार केले जात आहे. उपचारासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. पशुवैद्यकिय दवाखान्यांच्या वेळाही बदलल्या आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशीही दवाखाने सुरू राहणार आहेत. हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणे काय, कशामुळे होतो, याची माहिती होण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे.