Take a fresh look at your lifestyle.

Blog : म्हणून साडेतीन शहाणे आणि महाविकास आघाडीचा खेळ सेमच..!

“पेशवाईतील साडेतीन शहाण्यांची ख्याती सर्वश्रृत आहे. सखाराम बोकील, देवाजी चोरघडे, विजय सुंदर, नाना फडणवीस ही पेशवाईतील कारभार चालवण्यात वाकबगार अशी मंडळी होती. आजच्या वर्तमानातही अशाच साडेतीन शहाण्यांची महाराष्ट्राला पुन्हा एकदा ओळख होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी पक्ष, शेकाप या राजकीय पक्षांचा समावेश असलेली महाविकास आघाडी एक राजकीय गरज म्हणून तयार झाली,” असे राजकीय व सामाजिक विश्लेषक हर्षल लोहोकरे यांनी व्यक्त केले आहे. आम्ही त्याचा फेसबुकवरील लेख जसाच्या तसाच प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement

ही आघाडी व्हावी, यासाठी शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे व संजय राऊत या २१ व्या शतकातील साडेतीन शहाण्या मंडळींनी डोकं देऊन व धाडस करून महाविकास आघाडीला मान्यता दिली. पैकी गांधींची भूमिका ही या सरकारला दिलेल्या आशिर्वादा इतकी दिसते, सध्या तरी सरकारमध्ये त्यांचा थेट हस्तक्षेप व वरचष्मा नजरेस येत नाही. सुरूवातीला सरकार येणार म्हणून घोषणा, डरकाळ्या आणि राणा भीमदेवी थाटातील वल्गना यांची भुरळ या महाराष्ट्राला पडत होती, गल्लीपासून दिल्ली पर्यंत लोक नवं काही घडणार, म्हणून हरखून गेले होते.  आता शेतकरी वर्गाचे प्रश्न सुटणार, पिकाला पाणी, ऊसाला एकरकमी भाव, स्वस्तात व सवलतीत वीज मिळणार, कामगारांवरील अन्याय दूर होणार, शहीद नरेंद्र दाभोलकर, शहीद गोविंद पानसरे यांच्या खुन्यांना पकडण्यात येणार, जस्टीस ब्रिजगोपाल लोया प्रकरणाचा तपास होणार, खोट्या आरोपात अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांची सुटका होणार, सदरक्षणाय खलनिग्रहणाय चा प्रत्यय सर्वांना येणार, अशी भाबडी अपेक्षा होती.

Advertisement

पण महाविकास आघाडीच्या बौद्धिक दिवाळखोरीच्या एकसेएक प्रकरणांनी जनमत या आघाडीच्या विरोधात जात असल्याचे चित्र आहे.  श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडी शासनातील माजी मंत्री संजय राठोड यांना एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, चौकशीला सामोरे जावे लागले. गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांना १०० कोटी रकमेच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आल्यावर राजीनामा द्यावा लागला. सध्या ते आर्थर रोड जेलमध्ये कैदेत आहेत. नवाब मलिक यांच्यावर ईडी कडून दाऊद इब्राहीम शी आर्थिक व्यवहार करण्याचा आरोप ठेवण्यात आला, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  राज्यातील विरोधी पक्ष भाजपाचे नेते मिडीयात जे आधी सांगतात, त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा कारवाया करतात, हे सामान्य जनतेला लक्षात येऊ लागले आहे. भाजपाचे नेते सभागृहात व सभागृहाबाहेर अभ्यासूपणे सरकारला धारेवर धरत आहेत. विविध पुरावे सादर करून सरकारला कोंडीत पकडत आहेत. यांवर उपाय म्हणून श्री. संजय राऊत पत्रकार परिषदांतून विरोधी पक्षावर घणाघाती आरोप करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यांत खुलेआम कारवाया करत आहेत, त्यांवर महाविकास आघाडीचे मंत्री व नेते निषेध आंदोलन करत आहेत!!

Advertisement

तिकडे यूपी मध्ये आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या राज्यातील निवडणूकीत करण्यात आलेल्या इव्हीएम मधील अफरातफरीची माहिती देताना समाजवादी पक्षाचे नेते श्री. अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढाई लढावी लागणार असल्याचे सूचित केले आहे. यावरून धडा घेत महाराष्ट्र व महाविकास आघाडी सजग होईल काय ? महाविकास आघाडीचे निमंत्रक श्री. शरद पवार यांचे वय ८१ वर्षे आहे. महाविकास आघाडी सरकारचे सर्वात तरूण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे वय ३१ वर्षे आहे. दोघांच्या वयातील अंतर हे ५० वर्षांचे आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकूण ४२ मंत्री आहेत. यावरून महाविकास आघाडीतील सदस्य पक्ष व नेत्यांच्या अनुभव, वय व आकलन यांतील वैविध्य लक्षात येते. या अनुभव, उर्जा आणि संघटन कौशल्याचा वापर महाराष्ट्र हित जोपासण्यासाठी कधी करण्यात येणार आहे ? भाजपच्या एकाधिकारशाहीला विरोध म्हणून एकत्र आलेल्या पक्ष व सरकारकडून जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. जनहिताचे निर्णय घेऊन गैरवर्तणूक करणार्या सत्ताधार्यांसह विरोधकांवर कायदेशीर कारवाया करून कायदा व सुव्यवस्थेचे राज्य राबवण्याची अपेक्षा सामान्य जन करत होते. पण मागील अडीच वर्षातील सरकारचा कायदा व सुव्यवस्थेचा कारभार पाहता घोर निराशाजनक स्थिती पदरी पडते आहे.

Advertisement

साधं विरोधकांवर वचक निर्माण करताना सरकारची त्रेधा उडते आहे. विरोधक नेते, आणखीन मंत्री यांच्यावरील घोटाळ्यांचे आरोप यादी देऊन करत आहेत, पण सरकारकडून ना खुलासा होतोय वा जनमत दृढ करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.  महाविकास आघाडी सरकार चालवणार्या साडेतीन शहाण्या व अनुभवी मंडळींनी सरकारपुढील आव्हाने दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, पण केवळ आरोप करण्या पलीकडे फार काही सरकार पातळींवर घडत नाही.  …उद्या म्हातारी मेल्याचे दु:ख नसेल, पण काळ सोकावला, तर सामर्थ्य असूनही निव्वळ पळपुटेपणाच करण्याचे पाप कुठे फेडाल ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply