मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून ठाकरे गटानेही आक्रमक पवित्रा धारण केला. आम्ही आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. आजपासून (७ डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरूवात झाली आहे. या अधिवेशानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ठाकरे गटाकडून या प्रश्नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याबाबात बोलताना “हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे.

राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला. हा प्रश्न आम्ही अधिवेशनात उपस्थित करणार आहोत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नदेखील चिघळला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील अनेक गावांतील ग्रामस्थांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे,’ असा आरोप विनायक राऊत यांनी केला.“महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली जात आहे. वाहनं जाळली जात आहेत. महाराष्ट्रातील सीमाभागातील ग्रामास्थांना कर्नाटकमध्ये येण्याचे आमिष दाखवले जात आहे. कर्नाटक सरकारच्या याच भूमिकेविरोधात आम्ही सभागृहात आवाज उठवणार आहोत. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उद्धव ठाकरे गटाचे आम्ही सर्व खासदार संसदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत,” अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याच मुद्द्यावर शिंदे गट-भाजपा सरकाला लक्ष्य केलं आहे. हे सरकार नामर्द आहे. आम्ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नच्या मुद्द्यावरून विरोधकांशी चर्चा करत आहोत. आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जाण्यास तयार आहोत. तुम्हाला मला पुन्हा एकदा तुरुंगात टाकायचे असेल तर टाका, मात्र मी घाबरणार नाही. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

must read

Share.

Leave A Reply

Exit mobile version