मुंबई : शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. संजय राऊतांवर टीका करताना गायकवाडांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आहे. शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
“चित्रपटांमध्ये जसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं कोरलं होतं, तसंच शिंदे गटाच्या आमदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असं कोरलं आहे, याचा त्रास त्यांना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत होईल, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली आहे. त्यांनी राऊतांना थेट शिवी दिली आहे. राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे ‘****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं, तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजपा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठीक आहे, पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू…” असं गायकवाड म्हणाले.
must read