मुंबई : राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात एकीकडे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे भाजपा आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय दावे-प्रतिदावे चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. यांसदर्भात आज पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
ठाकरे गटाला पुढील निवडणुकीत उमेदवार मिळणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “जर आम्हाला उमेदवार मिळणार नसेल, तर तुम्ही काळजी नाही, आनंद व्यक्त केला पाहिजे. पेढे वाटले पाहिजेत. चांगली गोष्ट आहे ना. पण तुमची लेकरं उघडीपाघडी रस्त्यावर फिरतायत, त्यांच्याकडे तुम्ही बघत नाहीयेत. आमचीच लेकरं घेऊन तुम्ही त्यांना आंगडं-टोपडं, काजळ-पावडर करताय ते बंद करा”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच, सुषमा अंधारे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली आहे. “२०२३ला मध्यावधी निवडणुका खात्रीने लागतील. त्याची कारणं अनेक आहेत. पहिलं कारण म्हणजे भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस फार आहे. शिवाय मराठा समाजाकडे नेतृत्वक्षमता नसते असं दाखवण्याचा प्रयत्न टीम भाजपा आणि देवेंद्र फडणवीस करत असतील, तर या प्रकाराने मुख्यमंत्री आणि टीम व्यथित आहेत. त्यामुळे हे सरकार पडू शकतं”, असं भाकित सुषमा अंधारे यांनी यावेळी केल. “आमच्याकडे उमेदवार येणार की नाही हे काळ ठरवेल. ४० आमदार गेले, तरी त्याच्या दुप्पट आमदार आणण्याची ताकद उद्धव ठाकरेंमध्ये आहे. ‘१०३ दिवस आत राहिलो, १०३ आमदार निवडून आणेन’, हे संजय राऊत म्हणाले ते खरं आहे. येणाऱ्या काळात हातकणंगलेमधून डॉ. सुजीत मिणचेकर आमदार असतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल”, असंही अंधारे म्हणाल्या.
must read