मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपाचे आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा विरोधकांनीक्रमक पवित्रा धारण केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बेताल व्यक्तव्यं करून नयेत, असा सल्ला विरोधकांकडून दिला जातोय. याच प्रकरणावर उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवरायांशी तुलना करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, हा तर महाराष्ट्राचा द्वेष आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून शिंदे गटावर टीका केली आहे. ‘इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही. हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!’ असे आदित्य ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
must read