मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांनी शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. मात्र, एकनाथ शिंदे तिथून निघताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी जात गोमूत्र शिंपडलं. या प्रकाराचा शिंदे गटातील आमदारांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. “ज्यांनी गोमूत्र शिंपडलं त्यांनी आधी मातोश्री पवित्र करा” असा सल्ला शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांनी दिला आहे.
“काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्पर्शाने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची मातोश्री अपवित्र झाली आहे”, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे. “बाळासाहेब ठाकरे कोणा एकाचे नाहीत. ते संपूर्ण देशाचे आहेत. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी आदर असून एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे कोणीही त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करायला जाऊ शकतं” असं गायकवाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गोमूत्र शिंपडल्याच्या प्रकारावर शिंदे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “बाळासाहेबांनी आयुष्यभर आमच्यावर हिंदुत्त्वाचे संस्कार केले. गद्दारांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. कोणी शिवसेना सोडून गेलं तर अशा आमदारांना रस्त्यात तुडवा, असा आदेश त्यांनी याच शिवतीर्थावरून दिला होता. त्यांच्या स्मृतीस्थळावर अशी अमंगल माणसं आल्याने शिवसैनिकांनी संस्कृतीप्रमाणे गोमूत्राने ते स्वच्छ केलं आहे” असं सावंत यांनी म्हटलं आहे.
must read