मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पहाणी केली. या वेळी शिंदे व फडणवीस यांनी एकाच वाहनातून शिर्डीपर्यंतच्या प्रवास केला. या वेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्या वाहनाचेही सारथ्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी हया ५३० किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी या महामार्गाची रस्तेमार्गाने पाहणी करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या रस्त्यावरुन प्रवास केला. मात्र या प्रवासामध्ये फडणवीस यांनी नेमक्या किती वेगाने गाडी चालवली? या मार्गावरील वेगमर्यादा किती आहे? यासारखे प्रश्न चर्चेत आहेत.
समृद्धी महामार्गाची रस्तेमार्गाने पाहणी करण्याचे शिंदे-फडणवीस यांनी पूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार फडणवीस शनिवारीच नागपुरात दाखल झाले होते. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी बरोबर १२.४५ वाजता त्यांनी समृद्धी महामार्गावरील प्रारंभ स्थानाहून (झिरो पॉइंट) शिर्डीकडे प्रवासाला सुरुवात केली. शिंदे आणि फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करीत होते. या वेळी फडणवीस हे स्वत: वाहन चालवत होते, तर मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. शिंदे तसेच फडणवीस यांनीही या दौऱ्यामधील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केले. अनेक ठिकाणी या दोन्ही नेत्यांचं जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं. हे स्वागत स्वीकारतच या दोन्ही नेत्यांनी पाच तासांचा हा प्रवास पूर्ण केला. फडणवीस यांनीही संभाजीनगरमधील पोखरी येथील एका बोगद्यामधून प्रवास करताना व्हिडीओ ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
must read