पुणे: गुरुवारी पुण्यात झालेल्या एका आंदोलनामध्ये हसावे की रडावे असाच प्रकार घडला. झालं असं की, आंदोलन सुरू असताना उत्साही महिला कार्यकर्त्याकडून राहुल गांधींचा निषेध करताना राहुल गांधींऐवजी सावरकरांच्या फोटोलाच चप्पल मारण्याचा प्रकार अगदी थोडक्यात टळला.
राहुल गांधींनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुण्यातील सारसबागेसमोरील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन शिंदे गटाचे पुणे संपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनातील बॅनरवर एका बाजूला राहुल गांधी यांचा लाल फुल्ली मारलेला आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो होता. सर्वजण घोषणाबाजी करीत असताना अचानक एक महिला कार्यकर्ती पायातील जोडे काढून बॅनरवरील सावरकरांच्या फोटोला जोडे मारण्यासाठी पुढे सरसावली. या महिलेची गल्लात होत असल्याचं एका कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्याने महिलेस रोखलं आणि तिला तिची चूक दाखवून दिली. त्यामुळे ही महिला वेळीच थांबली. मात्र आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या महिलेने राहुल गांधींचा निषेध करताना राजीव गांधी मुर्दाबादच्या घोषणाही दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
must read