पुणे : गड किल्ले महाराष्ट्राचा अतंत्य जिव्हाळ्याचा विषय. या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणं आगामी काळात काढण्यात येतील. निधीची कोठेही कमतरता भासणार नाही. गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल. शिवरायांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. या प्राधिकरणांतर्गत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केले जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेत्यांची उपस्थिती होती.
शिवरायांनी महाराष्ट्र घडवला. हे राष्ट्र घडवले. संपूर्ण जग शिवरायांकडे एक आदर्श राजा म्हणून पाहते. गडांची बांधणी पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. गडाचे प्रवेशद्वार, पाण्याची साठवण, तोफा यांची भव्यता पाहून सध्याचे जग अजूनही किती मागे आहे, अशी भावना येते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. “अनेक शिवभक्त, तसेच मावळ्यांची एक भावना होती. या गडावर असलेले अतिक्रमण दूर झाले पाहिजे, असे मत प्रत्येकाचे होते. कायद्याने, नियमाने काम करण्याचे धाडस काही लोक दाखवत नव्हते. मात्र छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता आपले सरकार स्थापन झाले आहे. आपल्या प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येतात. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतापगडावरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही. शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.“शिवाजी महाराज यांनी जलदुर्ग बांधले. आजही अनेक किल्ले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात. शिवाजी महाराज यांना आरमाराचे जनक म्हटले पहिजे. हे किल्ले नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे,” असेही शिंदे म्हणाले.
must read