मुंबई: ज्यांचा पोलिस भरतीचा अर्ज भरावयाचा राहून गेला असेल त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच आनंददायी ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी बातमी दिली आहे. अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रसारमाध्यमांना माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत आमच्याकडे ११ लाख ८० हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख आम्ही १५ दिवसांनी वाढवतो आहे. १५ दिवस अधिकचे आम्ही देत आहोत, त्यामुळे उर्वरीत ज्या तक्रारी आहेत, त्याही दूर होतील.”याशिवाय, “नॉन क्रिमिलीयरच्या संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या. मागील वर्षीचं नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र यावर्षी मिळतं. त्यामुळे मागील वर्षीचं त्यांनी यावर्षी घेतल्यावर ते ग्राह्य धरलं जाणार आहे. ही अडचणही दूर करण्यात आलेली आहे. भूकंपग्रस्तांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस भरती संदर्भातील ज्या काही मागण्या होत्या, त्या सगळ्या आम्ही मान्य केलेल्या आहेत.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
must read