मुंबई: शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राजकीय टोलेबाजी करणारी एक कविताच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच ठाकरे गट, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनाही टोला लगावला आहे.
“शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..यात शिवरायांचा अपमान नाही? भ्रष्टवादींच्या गजभियेंना महाराज बनून ऐऱ्या-गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही? यात शिवरायांचा अपमान नाही? येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरदपवारांनी एकदाही एखादा गड चढला नाही यात शिवरायांचा अपमान नाही?” असा सवाल या कवितेच्या माध्यमातून नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. “शाहिस्त्याची बोटं छाटतानाच्या देखाव्यात कार्यकर्ते शिवरायांना शरदमुखचंद्र चिकटवतात. भ्रष्टवादीच्या ऑफिशियल अकाउंट वरून ट्वीट करतात..यात शिवरायांचा अपमान नाही?” असंही या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान, या ट्वीट्समधून संजय राऊतांनाही म्हस्केंनी टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत..दम तर तसा काहीच नाही भाऊत. पण मागतो पुरावे शिवरायांच्या वंशजांना..सिद्ध करा म्हणतो तुमच्या रक्तातल्या शिवाजींना..यात शिवरायांचा अपमान नाही? औरंग्याच्या कबरीवर वाहिली फुले, कबरीला त्या नराधमाच्या संरक्षण दिले..यात शिवरायांचा अपमान नाही?”, असाही सवाल म्हस्केंनी उपस्थित केला आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांच्याप्रमाणेच नरेश म्हस्केंनी सुषमा अंधारेंचाही या कवितेमध्ये उल्लेख केला आहे. “अंधारे बाई तर कहरच करतात..निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर त्याच्या आईची तुलना जिजाऊशी करतात..यात शिवरायांचा अपमान नाही?” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
must read