मुंबई : मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आल्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोढांवर टीका करण्यात आली आहे. या पार्श्वबूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, “विरोधक काय बोलतील, त्यांचा तो अधिकार आहे. पण जे काही झालं नाही, जे टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे. जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, मी काय सांगितलं हे त्यांनी बघितलं असेल का? त्यांनी नाही बघितलं. मी फक्त उदाहरण दिलं होतं. कधीही तुलना केली नाही करू शकत नाही. कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार. याशिवाय “मी कधी वैयक्तिक टिपण्णी करत नाही. मी कधी राजकारणात जात नाही, मी असं समजतो की सरकारचं काम सकारात्मकतेने करायचं आहे. महाराष्ट्रात फार काही समस्या आहेत. जे काही माझ्याकडे दोन-तीन विभाग आहेत, त्यामध्ये मी काय करू शकतो, त्याच्या मी प्रयत्नात असतो. राजकारणात आजपर्यंत गेलो नाही आणि नंतरही जाणार नाही. हे जे काही झालं ते आता बंद केलं पाहिजे.”याचबरोबर “आरोप करणे हा लोकशाहीत विरोधी पक्षाचा अधिकार आहे, सर्वांचाच अधिकार आहे आणि आम्ही त्याचं उत्तरही दिलं पाहिजे, यासाठीच तुमच्या समोर आलो आहे. मी तुलना केली नाही, मी उदाहरण दिलं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण प्रत्येक मुलाला दिलं जातं. त्याच्या जन्मापासून त्याला शिकवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? मग तेव्हा त्यामध्ये काय त्यांची तुलना केली जाते का? याविषयी ज्याप्रकारे राजकारण केलं जातय ते राजकारण व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराज चमकणारा सूर्य होते, त्यांची त्याच स्थानवर पूजा केली पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वादात आणणं बंद झालं पाहिजे.” असंही यावेळी लोढा म्हणाले.
must read