मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.‘कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय.’ असं रोहित पवारांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.
याचबरोबर, ‘संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही.’उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे. यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
must read