मुंबई: किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे. तसेच अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला.
त्यानंतर यावर अनिल परबांनी प्रतिक्रीया देत “या रिसॉर्टचा मालक मी नसून सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र जाणूनबुजून किरीट सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावत आहेत. सदानंद कदम माझे मित्र आहेत. या रिसॉर्टच्या बाबतीत कोर्टाचे जैसे थे असे आदेश आहेत. या आदेशांतर्गत कोर्टाने या रिसॉर्टला संरक्षण दिलेले आहे,” असे अनिल परब म्हणाले. “मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्या यांचा उद्देश होता. ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्याबाबत सोमय्या एकही शब्द बोलत नाहीत. सोमय्या यांनी माझ्यावर मुद्दामहून आरोप केले आहेत. नारायण राणे यांच्या घरावरही कारवाई केली आहे. तिकडे सोमय्या हातोडा घेऊन जात नाहीयेत. साई रसॉर्टच्या बाजूला आणखी एक रिसॉर्ट आहे. तो माणूस गरीब आहे. त्याचा तर काहीही संबंध नाही. माझ्या माहितीनुसार साई रिसॉर्ट बांधण्यास सरकारनेच परवानगी दिली होती. सरकारने दिलेली परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे, हे तपासावे लागेल,” असे अनिल परब म्हणाले.
must read