मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्यानंतर सातत्याने महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे उद्योग राज्याबाहेर जाण्याला शिंदे सरकार जबाबदार असल्याच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळेच हे उद्योग बाहेर जात असल्याचे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात येत आहे. आम्ही एमओयू करून विसरणारे लोकं नाही. एकदा एमओयू झाल्यानंतर आम्ही त्यांचा पाठपुरवा करतो, असे ते म्हणाले. आज मुंबईत झालेल्या कौशल्य क्षेत्रीय परिषदेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणतात “राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आपला भर रोजगारावर असला पाहिजे, असा निर्णय आम्ही घेतला होता. पंतप्रधान मोदी यांनीही शासकीय रोजगारावरची अघोषित बंदी हटवत १० लाख रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही ७५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णय केला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “आज राज्याच्या विचार केला, तर ४५ टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध केल्याशिवाय युवकांना रोजगार देता येणार नाही. त्यासाठी कौश्यल्य विकास अत्यंत गरजेचा आहे. आज कोणत्याही कंपनीला विचारलं, तर त्यांच्यापुढे सर्वात मोठी समस्याही कुशल कामगारांची आहे. त्यामुळे कौश्यल्य विकास विभागाकडून युवकांच्या कौशल्य विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे”, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोलाही लगावला. “मंगल प्रभात लोढा यांनी सांगिल्याप्रमाणे आमच्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकल्पाचा आम्ही पाठपुरावा करतो. आम्ही एमओयू करून विसरणारे लोकं नाहीत”, असे ते म्हणाले. “आज जे एमओयू झाले आहेत, त्यांचा पाठपुरवा करू आणि काही समस्या असतील तर त्याही सोडवू. मात्र, जोपर्यंत ठरलेल्या एमओयूचा आकडा पार होत नाही, तोपर्यंत सातत्याने आमचे प्रयत्न सुरू राहतील. आज जे एमओयू झाले आहेत. त्यामाध्यमातून १ लाख तरुणांना रोजगार मिळेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
must read