मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून दपडशाहीचे राजकारण सुरू असून आव्हाडांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
भुजबळ नेमकं काय म्हणाले तर “गर्दीत कोणलाही धक्का लागू शकतो. एखाद्यावेळी आपण हात लावून बाजुला सरकायला सांगतो, यात कसला आला विनयभंग? अशा प्रकारे जर विनयभंगाचे गुन्हे दाखल होत असतील, तर लोकलमध्ये रोज महिलांना धक्के लागल्याच्या घटना घडत असतात, मग त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का? आणि जितेंद्र आव्हाडांवर कारवाई केल्याने सरकारची प्रतिष्ठा वाढली आहे का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारवर केली आहे. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री आणि इतर पोलीस कर्मचारीही तिथे होते, त्यामुळे असे गुन्हे दाखल करणं योग्य नाही”.“काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने माझ्यावर टीका केली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला फोन करून नेमकी त्याची समस्या का आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर लगेच माझ्यावर त्या वक्तीला धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला, अशा प्रकारे जर गुन्हे दाखल झाले तर कसं चालेल?” असा प्रश्ननही त्यांनी शिंदे सरकारला विचारला. “माझं मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे, तुम्ही दोघंही समजदार आहात. तुम्ही अनेक वर्षांपासून तुम्ही आमच्या बरोबर काम करत आहात. त्यामुळे कोणाविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करावा, याचं भान ठेवायला हवं. केवळ बदनामी करण्यासाठी गुन्हे दाखल करू नये. जितेंद्र आव्हाडांवर जो गुन्हा दाखल झाला, तो अत्यंत चुकीचा आहे. उलट हे प्रकरण सरकारवरच उलटलेलं आहे. कारण या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वकाही स्पष्टपणे दिसत आहे”, असेही ते म्हणाले.
must read